मुंबई (वृत्तसंस्था) तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा,अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका ठाकरेंवर टीका केली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनकरतांना ते बोलत होते.
मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत अमित शाह यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उधळला.
भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिशन १३५ ची घोषणा केली. ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, याशिवाय नितेश राणे, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदि नेते उपस्थित होते
















