छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडली आहे. अरुण भागचंद इनामे (वय २५, रांजणगाव खुरी ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रांजणगाव खुरी येथील दर्गा रोडवरील तलावावर दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोळा सणानिमित्त अरुण हा बैल धुण्यासाठी गेला होता. दरम्यान, बराच वेळ झाल्याने तो पाण्याबाहेर आला नसल्याने गावातील तरुणांना शंका आली. त्यानंतर नवनाथ इनामे व अन्य तरुणांनी तलावात त्याचा शोध घेतला. अरुणला बेशुद्धावस्थेत तलावातून बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकुलता एक मुलाचा मृतदेह बघताच आई वडिल आणि बहीण एकच आक्रोश केला. यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते.