चंद्रपूर (वृत्तसंस्था) तालुकास्थळापासून २० किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर (मेंडकी) शेतशिवारात तुटलेल्या जिवंत विद्युत तारांच्या धक्क्याने शेतमालकासह चार जणांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये गणेशपूर येथील तिघांचा, तर जवळच्या चिचखेडा येथील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे. प्रकाश खुशाल राऊत (४०), नानाजी पुंडलिक राऊत (५०), युवराज झिंगर डोंगरे (४५) व पुंडलिक मानकर (६०) अशी मृतांची नावे असून, सचिन नन्नावरे (३३) हा जखमी आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे धानपिकाच्या बांधावर पाणी साचल्याने शेतमालक प्रकाश राऊत यांनी बुधवारी धानपिकाला खत देण्याचे नियोजन करून सहा व्यक्तींसोबत खत शेतात घेऊन गेले होते. धानपिकाला खत दिल्यानंतर वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांधावरील तारांचे कुंपण सुरळीत करीत असताना विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला झाला. मात्र विहिरीच्या मोटर पंपावरील केबल टाकताना अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क पाण्याच्या प्रवाहाशी झाल्याने उपस्थित सातही जणांना जोरदार धक्का बसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे नेमका मोटरपंपाच्या केबलने की कुंपणाच्या तारांना स्पर्श होऊन धक्का बसला. याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून, चौकशीअंती ठोस कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे गणेशपूर व चिचखेडा गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर काही वेळातच जखमी शेतकऱ्याने घटनेची माहिती गावात देताच नागरिकांनी शेतशिवाराकडे धाव घेतली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवले. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची चौकशी केली जात आहे. एकाच वेळी विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला असून, हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.