सांगली (वृत्तसंस्था) इस्लामपूर येथील एक नवदाम्पत्य कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हृदयद्रावक म्हणजे लग्नानंतर देवदर्शन करून परतत असताना नवदाम्पत्याने आपले प्राण गमावले आहेत. इंद्रजीत मोहन ढमणगे (वय २९) आणि कल्याणी इंद्रजीत ढमणगे (वय २४) असं मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचं नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, इस्लामपूर येथील इंद्रजीत यांचा १८ फेब्रुवारी रोजी कल्याणी हिच्याशी विवाह झाला होता. थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर नवदाम्पत्यांनी आपल्या कुलदैवत असणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या शाकांभरी देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. इंद्रजीत आणि कल्याणीसह परिवार देवदर्शनाकरिता गेले होते. देवीचे दर्शन घेवून परतत असताना गुर्लापूर (ता. मुडलंगी) जवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची आणि इंद्रजीत यांच्या कारची शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समोरा-समोर धडक झाली. ज्यामध्ये इंद्रजित व कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघे नावदाम्पत्य जागीच ठार झाले. तर इंद्रजितचे वडील मोहन आणि आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले आहेत. मोहन यांचा हात फॅक्चर असून त्यांच्या डोक्याला ही गंभीर इजा झाली आहे. तर त्यांच्या पत्नी मिनाक्षी यांचा पाय फॅक्चर होवून डोक्याला गंभीर इजा झाली आहे. दरम्यान, कल्याणी यांचे माहेर इचलकरंजी हे आहे. तर इंद्रजित हे मुंबई येथे टीसीएस कंपनीत नोकरीस होते.
















