जामनेर (प्रतिनिधी) गोठ्यातील गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी आणत असताना नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. यावेळी ट्रॅक्टर अंगावर पडल्याने त्याखाली दबून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुपडू सुकदेव देसाई (वय ६५ वर्ष, रा. सामरोद ता. जामनेर), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सामरोद येथील रहिवासी सुपडू देसाई हे गोठ्यातील गुरांना कडबा कुट्टी आणण्यासाठी शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते. या ठिकाणी त्यांनी शेतातून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कडबा कुट्टी भरली. त्यानंतर कडबाकुट्टी भरलेला ट्रॅक्टर घेऊन घराकडे निघाले, मात्र काही अंतरावर चालक सुपडू देसाई यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि शेताच्या बांधालगत असलेल्या शेतातील विहिरीत कोसळले. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत अंगावर पडल्याने, त्याखाली दबून सुपडू देसाई यांचा जागीच मृत्यू झाला.
















