गाझियाबाद (वृत्तसंस्था) स्मशानभूमीचे छत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत असून, ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादनगर भागात आज घडली. दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात आज सकाळी हलका पाऊस पडत होता. त्यामुळे आडोसा म्हणून २५ जण स्मशानभूमीच्या छताखाली थांबले होते. त्यावेळी हे छत खाली उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर कोसळले.
ही घटना घडली त्यावेळी स्मशानभूमीमध्ये राम धन नावाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात होते. छताखाली थांबलेले बहुतेक जण राम धन यांचेच नातेवाईक होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून छताचा ढिगारा हटवून जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे काम लगेच सुरू केले गेले. NDRF चे पथक बचाव कामात गुंतले आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. एकूण मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून योगेंद्र, बंदी आणि ओंकार अशी त्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या आश्रित व्यक्तींना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच मंडळायुक्त मेरठ आणि एडीजी मेरठ झोन यांच्याकडून घटनेचा अहवाल मागविला आहे. दयानंद कॉलनीतील दयाराम यांचे शनिवारी आजारामुळे निधन झाले होते. रविवारी मुरादनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी १० पेक्षा अधिक लोक आले होते. पावसापासून बचावासाठी लोक गॅलरीखाली उभे होते. अचानक गॅलरीचे छत कोसळले.