नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. देशातील कर भरणारा मोठा वर्ग हा पगारदार आहे. ज्याचे महिन्याचे उत्पन्न निश्चित असते. अशा व्यक्तीचे लक्ष्य अर्थसंकल्पातील एकाच गोष्टीवर असते ते म्हणजे आयकर सवलत किती दिली जाते. यावर्षी निर्मला सीतारामन आयकरात सवलत देतील असे वाटले होते. पण टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. महत्वाचं म्हणजे आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आलं असल्याचं जाहीर केलं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षात करोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं. पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प होता. यावेळीदेखीलअर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडण्यात आला. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता.
शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्समध्ये ५०० अंकाची वाढ
दुसरीकडे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये उत्साह पहायला मिळाला. शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्समध्ये सकाळी ५०० अंकाची वाढ पहायला मिळाली. तर दुसरीकडे सोमवारीदेखील चांगली वाढ पहायला मिळाली होती. तर दुसरीकडे अर्थसंकल्प वाचन सुरु असताना ९०० अंकांची वाढ पहायला मिळाली. आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात आर्थिक विकास दर आणि अनुकूल जागतिक संकेतांच्या आधारे सेन्सेक्समध्ये ८१३ अंकांची वाढ होऊन ५८ हजारांच्या पुढे जाईल अशी शक्यता व्यक्त केली होती.