जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील नागरिक प्राथमिक नागरी सुविधांच्या अभावी प्रचंड त्रस्त आहेत. तशात पक्षांतर्गत आणि महापालिकेच्या राजकारणात सक्रीय पदाधिकारी आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे जळगाव विधानसभेतील नाराजीचा फटका लोकसभेलाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेची एक-एक जागा महत्वाची असतांना जळगाव लोकसभा मतदार संघाची ही स्थिती वरिष्ठांपासून लपून कशी राहू शकते?, ते यावर काही उपाय करतील का?, याचीच चर्चा सध्या जळगाव शहरासह भाजपच्या अंतर्गत राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर असल्यामुळे तर या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
जळगावातील रस्ते, आरोग्यासह आता जीवावर देखील उठले आहेत. दिवसभर धुळीचे लोट उठत असल्याने प्रदूषण कमालीचे वाढत आहे. तर अतिक्रमण, कचऱ्यासह विविध समस्यांनी जळगावकर कमालीचे त्रस्त आहे. या सगळ्या गोष्टीला महापालिकेतील किळसवाने राजकारण कारणीभूत आहे. जळगावकरांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवला आणि २०१८ च्या निवडणुकीत जळगावकरांनी तब्बल ५७ नगरसेवकांचे बळ भाजपच्या पारड्यात टाकले. भाजपचा महापौर आणि उपमहापौर झाला. दुर्दैवाने पक्षांतर्गत कलहामुळे कालांतराने तब्बल ३६ नगरसेवक फुटून पक्षातून बाहेर पडले होते. याचा बऱ्यापैकी दोष आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यप्रणालीला देण्यात आला होता.
दुसरीकडे शहरातील भाजपमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतही आमदारांचा पाहिजे तसा संवाद नसल्याची चर्चा अधून-अधून समोर येत असते. तसेच आजही अनेक पालिकेच्या राजकारणात सक्रीय माजी नगरसेवकांचे राजूमामा भोळे यांच्यासोबत जमत नाही. थोडक्यात जळगावकरांची नाराजी, पक्षांतर्गत कुरघोडी आणि पालिका वर्तुळातील नगरसेवकांसोबत समन्वयाचा अभाव लक्षात घेता जळगाव विधानसभेतील नाराजीचा फटका लोकसभेलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप एक-एक जागेची काळजी घेत असतांना जळगाव विधानसभा मतदार संघातील कठीण परिस्थिती भाजपला परवडनारी नाहीय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर आहेत. ते आज युवकांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील काही निवडक लोकांची भेट देखील घेणार असल्याचे कळते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात काही दिवसापासून उमेदवार बदलाची चर्चा सुरु आहे. तसेच एकनाथराव खडसे यांचा भाजप प्रवेशसह थेट रावेरमधून उमेदवारी देण्याबाबत गांभीर्याने विचार असल्याच्या चर्चेला तर उधाण आले आहे. खडसे मागील काही दिवसांपासून शांत आहेत. त्यांनी आपल्या शैलीप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर टीका टिपण्णी केलेली नाही. विशेष म्हणजे एका आमदाराने चक्क खडसे यांना भाजपात घेण्यात यावे, यासाठी थेट अमित शहा यांना पत्र लिहिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पत्राचे आगामी काळात मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे मागील काही दिवसापासून वादात सापडले आहेत. चाळीसगावमधील भाजपच्याच पदाधिकाऱ्यांच्या व्हाटसअप ग्रुपमध्ये काहींनी उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केल्यानंतर वातावरण प्रचंड ढवळून निघाले होते. तो वाद शांत होत नाही तोच जालन्याच्या एका बड्या उद्योजकाने उन्मेष पाटील यांच्यासह निकटवर्तीयांवर कोट्यावधीच्या आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप लावत पोलिसात तक्रार दिली. यामुळे भाजपच नव्हे तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध जळगावच्या सोशल मीडियात अनेकदा संपर्काच्या अभावी टीका होत असते.
थोडक्यात जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपच्या दृष्टीने प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. पक्ष निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर अनेकांनी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त केल्याची चर्चा होती. यामुळेच जळगाव लोकसभा मतदार संघात तर इच्छुकांची मोठी गर्दी बघावयास मिळत आहे. रावेरच्या तुलनेत जळगाव लोकसभा मतदार संघात तर काही जण विद्यमान खासदारांचे तिकीट जणू कापल्याचे मानत आहे. एवढेच नव्हे आपली उमेदवारी निश्चित असल्यागत देखील फिरत आहेत. यामुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. एकंदरीत अमित शहा जळगावात आल्यावर फक्त युवकांशी संवाद साधणार की,जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील काही पदाधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेणार?, हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.