पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील जारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून जवळपास १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
जारगाव येथील सिद्धीविनायक नगर, नाथ मंदिरासमोरील निवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांच्या घरी ही चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम लंपास केली आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता मोरे दाम्पत्य लग्न समारंभासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. २५ फेब्रुवारीला सायंकाळी ४.३० वाजता ते घरी परतले असता, घराबाहेर कुलूप असल्याचे दिसले. मात्र, मुख्य दरवाज्याचा कडी-कोंडा तुटलेला होता. घरात प्रवेश करताच सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. यानंतर त्यांना चोरी झाल्याची खात्री पटली. चोरट्यांनी ५० हजाराची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ८ ग्रॅम वजनाच्या प्रत्येक ४० हजाराच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजारची चांदीची समई, अगरबत्ती स्टँड, ताटली, लक्ष्मीचे कॉईन व ३७ हजार रुपये रोख चोरुन पोबारा केला आहे
या संदर्भात सुभाष मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी चोरीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.