नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील नांगल येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल यांनी भेट दिली होती व त्याचे फोटो ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर खातं बंद करण्यात आलं होतं. दरम्यान अखेर ट्विटरने कारवाई मागे घेतलं असून खातं अनलॉक केलं आहे. सोबतच काँग्रेस पक्ष आणि इतर महत्वाच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंटही सुरु झाले आहे.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. नंतर ट्विटरने त्यांचे अकाऊंट ६ ऑगस्टला तात्पुरतं निलंबित केलं होतं.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.ट्विटर हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असून भारतीय लोकशाहीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता
भाजपा-काँग्रेसमध्ये वादावादी
ट्विटर खाते बंद करण्यावरून राहुल गांधी यांनी ‘ट्विटर-इंडिया’ला लक्ष्य बनवल्यानंतर, या वादात शुक्रवारी भाजपाने उडी घेतली होती. आक्षेपार्ह छायाचित्र ट्वीट केल्यानंतर राहुल गांधी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेऊ शकत नाहीत, अशी टीका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी केली. राहुल यांचे अस्तित्व फक्त ट्विटरवर असून तेही आता बंद झाल्याने ते टीका करत असल्याचा आरोप सूर्या यांनी केला होता.
या प्रकरणी ट्विटरने खालील स्पष्टीकरण दिलं होतं,
ट्विटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करतं. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणाऱ्या सर्वांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आहे आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला ट्विटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. कंपनीच्या धोरणानुसार, एखादे ट्वीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते ट्वीट डिलीट केलं नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन पीडितेच्या पालकांची ओळख ट्विटवरुन जाहीर केल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आम्हाला कळवलं होतं. या गोष्टीमुळे कंपनीच्या नियमांचे आणि भारतीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ट्विटरने काही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याचा निर्णय घेतला.