मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांकडून समजतं.
नुकतंच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारीही दिली, परंतु त्यांचा पराभव झाला. यामुळे अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. पण मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचं समजतं. तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं कळतं. महाविकास आघाडीनं संभाव्य यादीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केल्याचं समजतं. त्यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याचं कळतं. उर्मिला या अभिनय क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या नावाला राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिलाशी चर्चा केल्याचं समजतं. पण, उर्मिला मातोंडकर यांनी ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसंच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं.
















