वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानच्या दौऱ्यावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. नॅन्सी पेलोसी यांचे विमान तैवानच्या हद्दीत आल्यानंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली असून तैवानचे तैईपेई विमानतळ बॉंबने उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे काही तास जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
सुरुवातीला थोड्या पिछाडीवर असलेल्या जो बायडेन प्रशासनाने आता चीनशी थेट मुकाबला करण्याची तयारी केली आहे. चीनची पिपुल्स लिबरेशन आर्मीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेलोसी यांचे एयरक्राफ्ट जर तैवानच्या दिशेने गेले तर चिनी एयरफोर्सचे फ्लीट त्याला घेरणार असल्याची माहिती आहे. त्यांना थांबवण्यात येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी चीनच्या एयरफोर्सने सोमवारी आणि मंगळवारी एयरफोर्स आणि नेव्ही ड्रील केल्याची माहिती आहे. चीन किती मोठी कारवाई करु शकेल, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. या क्षेत्रात गेल्या काही काळात, अमेरिकाही तेवढीच ताकदवान झाली आहे.
नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये येणार असल्याने चीनने या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तर दुसरीकडे तैवानमध्ये नॅन्सी पेलोसींचे स्वागत करण्यासाठी तिथल्या सरकारने मोठी तयारी केली आहे. गेल्या एका दशकापासून तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव आहे. तो आता शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं आहे. सद्य स्थितीला अमेरिकेसमोर चीन आणि रशिया हे मोठे शत्रू आहेत. रशिया आता युक्रेनच्या युद्धामध्ये गुंतला असून हे युद्ध लांबल्यास रशियाची आर्थिक परिस्थिती ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीननेही तयारी केली असून कारवाईसाठी लाँग रेंज हुडोंग रॉकेट आणि रणगाडे तयार ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर तैवानमध्येही चीनचे लष्करी तळ आहेत. त्यांचाही वापर केला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन सैन्याचेही चिनी सैन्यांच्या हालचालींवर नजर आहे.
अमेरिकी नेते तसेच अधिकाऱ्यांची तैवानला भेट म्हणजे तैवानच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकाचा पाठिंबा असल्याचे चीनकडून गृहित धरले जाते. मात्र तैवानला भेट दिली म्हणजे आम्ही आम्ही तैवान स्वातंत्र्याचा पाठपुरावा केला असा त्याचा अर्थ होत नाही, असे अमेरिकेने चीनला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन-अमेरिका यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.