काबुल (वृत्तसंस्था) अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना ४८ तासांमध्ये धडा शिकवला आहे. इसिसच्या तळांवर आज सकाळी ड्रोननच्या सहाय्याने बॉम्ब हल्ले केले आहे. गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात १३ अमेरिकन सैन्यासंह ९५ नागरिकांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शत्रूला शोधून मारणार असल्याचे सांगितले होते.
काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही या हल्लेखोरांना माफ करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेवर मोठा दबाव होता. काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसच्या खोरासन गटाने घेतली होती. हा गट ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, म्हणजे नांगरहरच्या परिसरात अमेरिकेने बॉम्बचा वर्षाव केला आहे. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासन) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट तालिबानचा कट्टर विरोधक असल्याचं समजलंय जातं. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय.
दरम्यान, अमेरिकेने ३१ ऑगस्टआधी आपली बचाव मोहीम संपवणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र अडकलेल्या नागरिकांची संख्या पाहता यामध्ये अधिक कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गरज पडली तर ३१ ऑगस्टनंतरही मोहीम सुरु राहील असं जो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र जशीजशी ही तारीख जवळ येत आहे त्याप्रमाणे काबूल विमानतळावर पुन्हा एकदा घातपात होण्याची भीती व्यक्त केली जातेय.