लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या ११२ च्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २९ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालीन सेवांसाठी असणाऱ्या ११२ च्या व्हॉट्सअप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या धमकीमध्ये असं म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांकडे केवेळ ४ दिवस शिल्लक आहेत. या ४ दिवसात माझं काय करायचं ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल.
धमकी ज्या क्रमांकावरुन आलीय त्या क्रमांकाचा तपास करण्यासाठी एक सर्व्हिलन्स टीम स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी येथील कंट्रोल रुममध्ये ११२ चे ऑप्रेशन कमांडर अंजुल कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम स्थापन करण्यात आलीय. ही टीम या प्रकरणामधील तपासावर लक्ष ठेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.