अमळनेर (प्रतिनिधी) प्रशासनाने १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना लसीकरणाला परवानगी दिलेली असल्याने त्यांना शाळेतच लसीकरण करून मिळावे, यासाठी तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, १५ ते १८ वयोगटातील ९०% विद्यार्थी हे ९ वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणारे असून नियमित शाळेत येणारे आहेत. कोविड- १९ बाबत या वयोगटासाठी लसिकरण शासनाने सुरु केले, मात्र हे तरुणांचे वय असून त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारा गोंधळ, हाणामारी टाळण्यासाठी शालेय शिस्तीच्या वातावरणात लसीकरण करणे योग्य होईल. त्याचप्रमाणे मुलींना इतरत्र लसीकरणासाठी जातांना सुरक्षेसाठी पालकांना सोबत न्यावे लागेल. मात्र हीच बाब शाळेत आयोजित केली तर एकाच दिवशी बऱ्याच प्रमाणात लसीकरण होऊन वेळ व परीश्रम वाचतील आणि शालेय वातावरण देखील लवकर अधिक सुरक्षित होईल. १५ ते १८ वयोगटासाठी क्रमाक्रमाने शाळा-महाविद्यालयात लसीकरणाचे नियोजन करून शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक जाहीर करावे असे आवाहन प्रशासनाला केले आहे.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम.ए.पाटील, टी.डी.एफ चे सचिव राहुल पाटील, टीडीएफ चे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे, साने गुरुजी पतपेढीचे सचिव तुषार पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी ४ पासून शाळा महाविद्यालयात लसीकरण व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.