मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून म्हणजे १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात एकाच वेळेस लसीकरण मोहिमेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरुवात करत आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वा. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वा. होणार आहे. पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत. मुंबईत एकूण ९ केंद्रांवर ४० बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी ७ हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत ६३ लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे ५० हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे. केंद्र सरकारनं कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यापैकी सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तरित्या निर्मिती केलेल्या कोव्हिशील्ड या लसीच्या तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पण भारत बायोटेकनं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी अद्याप सुरु आहे. त्यामुळे एकीकडे कोव्हिशील्डची परिणामकारकता समोर आली असली तरी कोव्हॅक्सिनची परिणामकारकता अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे लस घेणं ही ऐच्छिक बाब असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं असलं तरी लस निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र दिलेलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये अद्याप काहीसा संभ्रम कायम आहे.
राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) व २ जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल. महाराष्ट्रासह देशभरात आजपासून कोरोनाचं लसीकरण सुरू होत आहे. पंतप्रधानांकडून लसीकरण आणि कोविन ऍपचा शुभारंभ तर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाची सुरुवात झाली आहे.