जळगाव (प्रतिनिधी) : येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या वैभव मावळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांची “खान्देशातील निवडक लोककलांमधील नाटकीय तत्व व घटकांचा चिकित्सक अभ्यास” या विषयात डॉ. संजय पाटील (के.एस.के. महाविद्यालय, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
निवडक सात लोककलांमध्ये खान्देश हा श्रेष्ठ असल्याचे डॉ. वैभव मावळे यांच्या संशोधनातून समोर आले आहे. केवळ खान्देशच नाही तर खान्देशच्या आजूबाजूला असलेली दोन राज्यांतही (गुजरात आणि मध्य प्रदेश) खान्देशच्या लोककला फोफावल्या असल्याचा त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी मान्य केला आहे.
खान्देशात वही गायन, किंगरी, होळी नृत्य, इंदल नृत्य, तगतराव, सोंगाड्या पार्टी आणि तूरथाल या कला असून यातील तत्व आणि घटकांचा त्यांनी अभ्यास केला आहे. यात मराठवाडा, विदर्भ, कोकणातील कलांप्रमाणेच खान्देशातील लोककला या सर्वश्रेष्ठ असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. येथील लोककलावंत आपापल्या कला जोपासत त्यांचे संवर्धन करत असून शाळा आणि महाविद्यालयांत याचे शिक्षण गरजेचे असल्याचा त्यांचे विचार आहेत. वही गायन अस्सल लोककला खान्देशी असून ती खान्देशचे ग्रामदैवत कानबाई तसेच मुंज, बारसे, यात्रा, जत्रा याठिकाणी त्यांचे सादरीकरण येथील लोककलावंत करताना आढळून येतात. या कला जतन करण्यासह त्यांचे संवर्धन करण्याचा मानस त्यांनी यावेळी सांगितला. त्यांनी नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.वैशाली बोदेले यांच्या देखरेखीत “खान्देशातील निवडक लोककलांमधील नाटकीय तत्व व घटकांचा चिकित्सक अभ्यास” या विषयात डॉ. संजय पाटील (के.एस.के. महाविद्यालय, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी केली आहे. डॉ.वैभव मावळे यांना विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन.भारंबे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
१२०० लोककलावंतांचा संचय
खान्देशाबरोबर मध्य प्रदेश आणि गुजरात येथील कलावंत हे खान्देशातील लोककला संवर्धनासाठी पाठपुरावा करताना आढळून येत आहेत. त्याचबरोबर एकूण खान्देशासह १२०० लोककलावंत हे आपापली कला सादर करताना आढळून येत असल्याने सर्वांचा नामोल्लेख त्यांनी आपल्या शोधप्रबंधात केला आहे.
खान्देशी भाषेचा गोडवा
खान्देशी लोककला या धुळे, जळगाव आणि नंदुरबारातील लोककलावंत आपापल्या भाषेत सादर करताना आढळून येतात. या लेवा, लेवा गणबोली, अहिराणी, तावडी, मावची, बंजारा या भाषेत लोककलावंत सादरीकरण असल्याने त्यांच्या भाषेचा गोडवा हवाहवासा वाटत असल्याचा निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून व्यक्त झाला आहे.