जळगाव (प्रतिनिधी) तुम्ही इंग्रजांची औलाद आहे का?, तुम्ही फॉरेनला पैदा झाले का? असं म्हणत सांताक्लॉजचे फोमचे पोस्टर डांबरी रोडवर टाकुन त्यावरून वाहने नेण्यास वाहनचालकांना भाग पाडले. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्याच्या उद्देशाने नुकसान व अपमान केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
मोगली बाबा उर्फ राहुल ठाकरे (रा. वाल्मीक नगर), निलु आबा उर्फ निलेश युवराज सपकाळे (रा. दिनकर नगर), अजय मंधान (रा. सिंधी कॉलनी, जळगाव), हितेश बागुल (रा. पिप्रांळा), सुशिल इंगळे (रा. पिप्रांळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हटलेय फिर्यादीत
पोलीस कॉस्टेबल राकेश मधुकर दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हापेठ पो.स्टे. ला हजर असतांना आम्हास गोपनिय माहिती मिळाली की, हिंदु राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते सुशिल इंगळे यांनी फेसबुकवर ख्रिश्चन धर्मिय यांचा भावना दुखावेल असा व्हिडीओ टाकला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ मी बघितला असता, तो नमुद व्हिडीओ हा जेडीसीसी बँके समोरील बेबी किड्स शॉप, उज्जीवन बँकेखाली रिंगरोड येथील असल्याचे निर्देशनांस आले.
नमुद शॉपचे मालक १) कुणाल हेमंत साळुंखे (वय ३१ रा. जळगाव मुक्ताईनगर एसएमआयटी कॉलेजच्या जवळ), पार्टनर २) केतन शिवाजी पाटील (वय ३३ रा. जळगाव मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेजच्या जवळ), पार्टनर क्रमांक ३) विश्वेश विश्वनाथ खडके (वय ३७ रा. जळगाव लक्ष्मी नगर, मु. जे. महाविद्यालय मागे प्लॉट नं. ०८) यांनी मिळून दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचे बेबी किड्स शॉप समोर क्रिसमसनिमित्त सांताक्लॉजचे कपडे घातलेला एक इमस लहान मुलांना चॉकलेट देतांना तसेच मिकीमाऊसचे कपडे घातलेले दोन इसम क्रिसमस ट्री त्यावर लाईटींग लावलेली. तसेच सांताक्लॉजचे ०४ पोस्टर्स फोमचे सिटने बनवलेले असा ख्रिसमसनिमित्त देखावा तयार केलेला होता. लहान मुले तसेच ईतर इसम दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी सदर देखाव्याचा आनंद घेत असतांना रात्री सुमारे वेळ ०८.०० वाजता नमुद ठिकाणी १) मोगली बाबा उर्फ राहुल ठाकरे (रा. वाल्मीक नगर), २) निलु आबा उर्फ निलेश युवराज सपकाळे (रा. दिनकर नगर), ३) अजय मंधान (रा. सिंधी कॉलनी, जळगाव) ४) हितेश बागुल (रा. पिप्रांळा) ५) सुशिल इंगळे (रा. पिप्रांळा) असे नमुद ठिकाणी येवुन ख्रिसमसनिमित्त देखावा पाहत असलेल्या लोकांना तेथील देखावा बंद करायला सांगितले.
तुम्ही इंग्रजांची औलाद आहे का? तुम्ही फॉरेनला पैदा झाले का? बंद करा, बंद करा असे ओरडून म्हणुन सदर देखाव्यामधील एक सांताक्लॉजचे फोमचे पोस्टर काढुन शॉप समोरील डांबरी रोडवर टाकुन त्यावरुन रस्त्याने जाणारे वाहने वाहनचालकांना नेण्यास भाग पाडले. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दाचा अपमान करण्याच्या उद्देशाने नुकसान व अपमान करण्याच्या उद्देशाने बुध्दिपुरस्कर व दृष्ट्र उद्देशाने धर्मामध्ये शत्रुत्व वाढविणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक अशी कृती करून त्यांचा नमुद व्हिडीओ बनवुन फेसबुकवर टाकला. त्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्या असून वरील नमुद आरोपी हे दिसून येत आहे. त्यापैकी एकाने व्हिडीओ रेकॉर्डींग केले असुन सदर व्हिडीओमध्ये आवाज येत आहे.
आधी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट नंतर डिलीट
तसेच सुशिल इंगळे यांने फेसबुकवर आज ख्रिसमस असल्यामुळे जळगाव येथे विविध ठिकाणी ख्रिसमसचा कार्यक्रम घेण्यात आला. यांचे परिणाम आपल्या हिंदु मुलांवरती होतात म्हणुन आम्ही हा ख्रिसमस कार्यक्रम बंद करण्यास हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये आमचे मोहन भाऊ तिवारी, मोगलीबाबा व निलु आबा अजय मंधान हितेश बागुल व मी सुशिल इंगळे हिंदु राष्ट्र सेना जळगाव जिल्हा, असे पोस्ट केले व व्हिडीओ फेसबुकवर टाकला व नंतर काही वेळाने नमुद व्हिडीओ फेसबुकवरुन डिलीट केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.