धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात सुरु असलेले पेव्हर ब्लॉक, बेलदार मोहल्लाजवळील संडास बांधकाम आणि झुमकराम वाचनालयाचे काम बोगस आणि नियमबाह्य होत असल्यामुळे त्यांची बिले काढण्यात येऊ नये. तसेच सर्व कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी एका तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. दरम्यान, या तक्रारी अर्जाची एक प्रत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठविण्यात आली आहे.
अॅड. संजय महाजन यांनी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धरणगाव शहरातील विविध भागात पेव्हर ब्लॉकची कामे चालू आहेत. या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. तसेच शहरातील प्रास्ताविक भुयारी गटारी आणि पाईप लाईनची कामे लक्षात घेता पेव्हर ब्लॉकवरील खर्च म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. वास्तविक बघता धरणगाव मुख्याधिकारी यांनी देखील २ फेब्रुवारीला झालेल्या सभेच्या टिप्पणीत पेव्हर ब्लॉक बसवताना आणि काँक्रीटीकरण करतांना निधीचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं कायदेशीर मत नमूद केलं आहे. त्यामुळे आपण याबाबत तत्काळ ३०८ प्रमाणे ठराव रद्द करण्यासाठी धरणगाव मुख्याधिकारी यांना आदेश द्यावेत. तसेच याबाबत जिल्हाधिकारी म्हणून आपण कायदेशीर आदेश देत नाही, तोपर्यंत धरणगातील शहरातील पेव्हर ब्लॉकची ठेकेदाराची बिले काढू नयेत.
तसेच धरणगाव शहरातील बेलदार मोहल्लाजवळील संडास बांधकाम मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. इस्टीमेट प्रमाणे काम होत नसून बांधकामचे साहित्य नित्कृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे या संडासच्या बांधकामाची आपण प्रत्यक्ष तसेच तक्रारदार म्हणून आमच्या समक्ष थर्डपार्टी ऑडीटर, पालिकेचे इंजिनिअर यांना आदेश देवून कामाची तात्काळ पाहणी करावी. जोपर्यंत थर्डपार्टी ऑडीटर आणि पालिकेचे इंजिनिअर येऊन पाहणी करत नाही. तसेच आपण अहवाल देत नाहीत. तोपर्यंत हे बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही थर्डपार्टी ऑडीट करतांना तक्रारदार म्हणून आम्हास समक्ष बोलावून आमच्या शंकेचे निरसन करूनच बिल अदा करण्यात यावे.
शहरातील झुमकराम वाचनालयाचे काम बोगस होत आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाची दिशाभूल करून जागा पलीकडे वर्ग करण्यात आली आहे. झुमकराम सार्वजनिक वाचनालयाला परवानगी देतांना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अटी-शर्थीच्या अधीन राहून परवानगी दिली होती. त्यातील पहिल्याच अटीचे उल्लंघन झाले आहे. त्यानुसार जागेचा वापर फक्त वाचनालयासाठी करण्याची अट तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घातली होती. त्यामुळे वाचनालयासोबत शॉपिंग कॉप्लेक्स कसे बांधले जातेय?, हा प्रश्न जनतेला पडला आहे.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी २७ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या आदेशात नुसार पालिकेकडून आलेल्या अ.क्र. 4 वरील पत्रान्वये मुख्याधिकारी नगर परिषद धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव यांनी दिनांक २४ जानेवारी २०१८ चे पत्रान्वये धरणगाव नगरपालिका हद्दीतील सरकारी जागा सिसनं. ३२६६,३२८२/अ/1. ३२८३/ब, ३२८४, ३२८५ ही झुमकराम वाचनालयाच्या लायब्ररीसाठी आरक्षित असलेली जागा नगरपालिका धरणगावकडे वर्ग होणेबाबतचा प्रस्ताव कार्यालयास विनंती केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विविध अटी शर्थीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती. परंतू जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून वाचनालयासोबत व्यापारी संकुल देखील बांधले जात आहे. त्यामुळे वाचनालयाचा मूळ हेतूच नष्ट होत आहे. तसेच या ठिकाणी बांधकाम करताना संत सावता माळी आणि दलित समाजाच्या पंच मंडळाची जागा बेकायदेशीरपणे वर्ग करून तत्कालीन जिल्हाधिकारी पर्यायी शासनाची फसवून केली आहे. तसेच यामुळे एका शिक्षण संस्थेसह दलित समाजावर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे झुमकराम वाचनालयाचे काम तात्काळ थांबवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत सविस्तर माहिती मागवून निर्णय घ्यावा. तसेच ठेकेदाराचे सर्व बिले तात्काळ थांबविण्यात यावीत, असे अॅड. संजय महाजन यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारी अर्जाच्या प्रती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी (जळगाव), प्रांतधिकारी (एरंडोल), तहसीलदार (धरणगाव) आणि मुख्याधिकारी (धरणगाव) यांना पाठविण्यात आल्या आहेत.