मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत. वर्षा राऊत यांनी सोमवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
वर्षा राऊत आता ५ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहतील अशी शक्यता आहे. ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याचं कळतं. दरम्यान ईडीने वर्षा राऊत यांच्या पत्राला अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते.
वेळ वाढवून मागितली आहे का? असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “हो मागितली आहे. इतकं मोठं प्रकरण आहे. संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या देशात सध्या काहीच सुरु नाही. सध्या ही ५० लाखांची एकच केस त्यांच्याकडे आहे. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल”.
















