जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासह व्हेंटिलेटरबाबत (ventilator) खोटी माहिती पसरवित शासनाची बदनामी केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. याबाबत आता पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.
काही महिन्यांपासून जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे, शिवराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयविषयी विविध खोटे आरोप करून जनमानसात जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस, मॅमोग्राफी मशीन धूळखात अशा प्रमुख मुद्द्यांवर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केले होते. यात कुठलीही सत्यता नसल्याने हे सर्व आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी खोडून काढले आहे.
दिनेश भोळेंसह तिघांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल
याप्रकरणी डॉ.चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचीकावर मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात याबाबत कामकाज चालले. याचिका दाखल करून घेत डॉ. चव्हाण यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले आहे. दिनेश भोळे, शिवराम पाटील, गजानन मालपुरे या तिघांवर प्रत्येकी एक कोटी रुपये अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर परत गेल्याने आता व्हेंटिलेटरची चणचण भासत आहे. तिघांनीही गेल्या काही महिन्यांपासून जे चुकीचे आरोप केले आहे, ते त्यांना आता न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या वतीने अँड. हरिहर पाटील यांनी काम पाहिले.