धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी विशाल मकवाने यांना नुकतीच आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्या प. रा. विद्यालयातील १९९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मूळ धरणगावचे व सध्या जळगाव येथे कार्यरत विशाल मकवाने यांना नुकतीच आयकर खात्यात अतिरिक्त आयुक्त पदी बढती मिळाली. त्यानिमित्त त्यांच्या दहावीच्या १९९७ च्या मित्रांच्या वतीने चोपडा रोड लगत असलेल्या डॉ. शैलेश सूर्यवंशी यांच्या शेतात छोटेखानी सत्कार समारंभ व वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशाल मकवाने हे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गेल्या बारा वर्षापासून आयकर खात्यात कार्यरत आहेत. नुकतीच त्यांना पदोन्नती मिळाली. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक मित्रांनी केले होते. सर्व मित्रांनी वतीने विशाल मकवाने यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना विशाल मकवाने यांनी यूपीएससी परीक्षेचे अनुभव कथन केले व अपयशच यशाची खरी प्रेरणा असल्याचे सांगितले. बारा वर्षांच्या आयकर खात्यातील अनेक महत्त्वाचे अनुभव त्यांनी याप्रसंगी सांगितले.
कार्यक्रमानंतर सर्व सदस्यांनी स्वादिष्ट वनभोजनाचा आनंद घेतला. नुकताच मागील महिन्यात याच १९९७ च्या बॅचच्या भव्य माजी विद्यार्थी पुनर्भेट कार्यक्रम संपन्न झाला होता. या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा सर्वांना एकत्र भेटण्याची संधी मिळाली याचा सर्वांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्थानिक मित्रांनी परिश्रम घेतले.