धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळीवाडा परिसरातील फुलहार गल्ली येथे “जागर स्त्री शक्तीचा – अधिकार मतदानाचा” नवरात्रोत्सवानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असतांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ पी डी पाटील यांनी नवीन मतदार यांची नोंदणी फॉर्म नंबर ६, फॉर्म नंबर ७, फॉर्म नंबर ८ विषयी विस्तृत अशी माहिती उपस्थित मतदारांना सांगत संविधानाने आपल्याला मताधिकार दिलेला आहे. तो हक्क आपण सर्वांनी अबाधीत ठेवावा असे श्री. पाटील सर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नायब तहसिलदार सी बी देवराज, लिपीक महेंद्र पवार, प्रभागाचे माजी नगरसेवक कैलास माळी, अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, जेष्ठ शिक्षक व्ही टी माळी, दिव्यांग सेनेचे अध्यक्ष वासुदेव वाघ, जेष्ठ नागरिक पांडुरंग माळी, ज्ञानेश्वर माळी, प्रभागातील बीएलओ पी डी पाटील यांसह असंख्य मतदार उपस्थित होते. तत्पूर्वी सुलाई माता मित्र मंडळाच्या वतीने सर्व अतिथींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
नायब तहसिलदार सी बी देवराज यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले व सर्वांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे गरजेचे आहे यासाठी आमचे बीएलओ आपणास सहकार्य करतील. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व सर्वांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन श्री. देवराज यांनी केले. तसेच, नवरात्रोत्सवनिमित्त सुलाई माता मंडळाकडून विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही टी माळी तर आभार नगरसेवक कैलास माळी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितेश महाजन, अजय महाजन, लालचंद वाघ यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.