जळगाव प्रतिनिधी : मतदान प्रक्रियेदरम्यान घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी चार ड्रोन राहणार आहे. शनिपेठ, रामानंद नगर, एमआयडीसी व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवी केंद्रांच्या परिसरात या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. या सोबतच २६२ बुथवर वेबकास्टिंग केले जाणार आहे. निवडणुकीच्या पुर्वसंध्येला पोलीस अधीक्षकांनी उपद्रवी केंद्राच्या ठिकाणी पाहणी केली.
महापालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ नगरसेवकपदासाठी ही निवडणूक होत आहे. शहरातील १६९ मतदान केंद्रांवर ५१६ बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान शांततेत होण्यासाठी पोलिस दलाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकुण मतदान केंद्रांपैकी गर्दी होणाऱ्या केंद्रावर अतिरीक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या सर्व केंद्रावर स्वतःभेट देत पोलिस अधीक्षकांनी आज पहाणी केली. त्यात गेंदालालमील, जुने जळगाव, कांचन नगर, शनिपेठ, मेहरुण अशा विवीध केंद्रांना पोलिस अधीक्षकांनी भेटी देत बंदोबस्तावर तैनात कर्मचारी व अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
मतदानाच्या पुर्वसंध्येला जळगाव शहरातील विवीध भागातून उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचे फोनकॉल्सने पोलिसांना हैराण करुन सोडले. पोलिस पोहचलेही वेळात मात्र, गर्दीची पांगापांग झाल्याने पोलिसांच्या हाती मात्र काही लागले नाही. तक्रारही कुणी दिली नाही तसेच शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवतीर्थ मैदानावर सुमारे दोनशेच्यावरऑटोरिक्षामधुन आलेल्या महिलांना पैशांचे वाटप होत असतांना गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस धडकलेही मात्र, त्यांच्या हाती काहीच लागेले नाही.
















