मुक्ताईनगर (प्रतिनिधी) “वारी” हा संस्कार सोहळा आहे. शेकडो वर्षांपासूनची चालत आलेली परंपरा असून परिवर्तनाची चळवळ आहे. भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते – बोलते विद्यापीठ म्हणजे “वारी” असल्याची भावना व्यक्त केली तर वारी म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालखी प्रस्थान सोहळ्यात संत मुक्ताईचे पूजन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोविडच्या आपत्तीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी कोरोनाचा सावट पूर्णपणे दुर झालेले नाही. यामुळे राज्य सरकार सतर्क आहे. या पार्श्वभूमिवर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणार्या आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून काढण्यात येणार्या वार्यांवर देखील प्रतिबंध कायम ठेवण्यात आले आहेत. अलीकडेच सरकारने मानाच्या दहा दिंड्यांना बसने वारी करण्याची परवानगी दिली होती. यात जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई देवस्थाच्या पालखीचा समावेश आहे. या अनुषंगाने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरा जाऊन पूजन केले. यानंतर त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनामुळे यंदा फक्त मानाच्या पालख्यांनाच बसने परवानगी देण्यात आलेली आहे. वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांपासूनची परंपरा असून भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे वारी होय. वारी आपल्याला शिस्त, भक्ती व शक्ती शिकवते. आज कोरोनामुळे जग त्रस्त झाले असतांना हे सावट जगावरून जाऊदे…आणि बळीराजाला ताकद मिळू दे अशी प्रार्थना आपण संत मुक्ताई चरणी केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, वारी केल्याने काय मिळते याचे उत्तर वारकरी एका शब्दात देतो तो शब्द म्हणजे “आनंद”. वारीमुळे आरोग्य, मनःशांती आणि समृद्धी मिळते. दिंडीत चालताना पांडुरंगाचे नामस्मरण केल्याने तसेच पालखी सोहळा सहभाग व सेवा दिंडीत काम केल्यामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते अगदी आतून आपण स्वच्छ होतो, “मी पणा” गळून पडतो आणि हे विश्वची माझे घर ही भावना जागृत होते वारी मुळे आपण आतून समृद्ध बनवते आणि जीवनाचा खरा अर्थ समजायला मदत करते. सर्वधर्म सम भावाचे खर्या अर्थाने दर्शन कुठे होते तर वारीत..! म्हणून वारी म्हणजे सर्व धर्म सम भावाचे प्रतीक होय असेही ना. पाटील म्हणाले.
वारकर्यांनी यंदा नियमित वारीची मागणी केली होती. मात्र कोरोनाचे सावट दूर न झाल्याने ही परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि, मानाच्या दिंड्यांमध्ये संत मुक्ताईच्या पालखीचा समावेश आहे. एक पालखी गेली तर सर्व वारकरी गेले असे समाधान मिळणार आहे. वारकर्यांनी या बाबी समजून घ्याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर कोरोनाची आपत्ती लवकरात लवकर जाऊन सर्वांना सुख मिळो ही प्रार्थना आपण केल्याचे त्यांनी पुनश्च नमूद केले.
माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताई मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती सांगून कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उर्वरित निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली असता मुक्ताई मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांसाठी ग्रामविकास, पर्यटन व इतर विभागांकडे पाठपुरावा करुन आवश्यक तो निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, हभप. रविंद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, तहसिलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, नरेंद्र नारखेडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रस्थान सोहळ्याचे सोशल मिडीयाद्वारे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते. यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या बघता आला. पालखी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम हा नवीन मुक्ताबाई मंदिरात असणार आहे, याठिकाणी पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील…आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बनले वारकरी !
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आयुष्यात वारकरी संप्रदायाला खूप महत्व असल्याचे आधीच दिसून आले आहे. त्यांनी याबाबत अनेकदा जाहीरपणे सांगितलेही आहे. या अनुषंगाने आज ते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सोबत वारकरी बनले. खडसे यांनी टाळ तर ना. गुलाबराव पाटील यांनी वीणा हातात घेऊन विठ्ठलनामाचा गजर केला तेव्हा उपस्थितांनी याला जोरदार दाद दिली. तर पालकमंत्र्यांनी रवींद्रभैय्या पाटील यांच्या सोबत पालखीच्या समोर फुगडी देखील खेळली. विठुरायाच्या व संत मुक्ताईच्या गजराने मंदीर परिसर दुमदुमून गेला होता.