धरणगाव (प्रतिनिधी) येथील पिल्लू मस्जिद परिसरातील महिलांनी सोमवार रोजी नगरपालिकेवर एल्गार पुकारला. गेल्या २० दिवसांपासून पाण्याचा पुरवठा होत नसल्याने महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करत पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी तक्रारदार महिलांनी सागितले की, प्रत्येक वेळेला आमच्या भागावर अन्याय होतो. सध्या रमजान महिना सुरु असून आमचे रोजे सुरु असतांना या दिवसांमध्ये देखील आम्हाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात आमच्या भागातील नगरसेवकाने आमच्याकडे ढुंकून देखील बघितले नसल्याची ओरड देखील यावेळी महिलांनी बोलून दाखविली. तसेच नगरपालिकेत तक्रार मांडण्यासाठी आम्ही आलो असता आमचे गाऱ्हाणे देखील ऐकूण घेण्यास याठिकाणी कुणीही नव्हते.
तर दुसरीकडे अशा कुठल्या महिला नगरपालिकेत आल्या असल्याची माहिती मला नाही. किंवा तसे निवेदन देखील नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. तसेच सध्या मुख्य जलवाहिनी फुटलेली असल्याने तिचे दुरुस्तीचे काम सध्या सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महिलांनी पुढे सांगितले की, नगरसेवकाने बोरिंग लावली मात्र ती काही दिवस चालली व नंतर बंद पडली. बोअर करून कुठलाही फायदा झाला नाही. मग बोअरिंग केलीच का ? असा सवाल देखील यावेळी महिलांनी केला. दरम्यान, एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाई सुरु झाल्यामुळे मे महिन्यात काय होईल?, याची चिंता धरणगावकर व्यक्त करत आहेत.