जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपासाठी नव्याने जलशुद्धीकरण यंत्रणा आणि वॉटर मीटर बसविण्यासंदर्भात एका खाजगी कंपनीने प्रस्ताव दिला होता. शनिवारी यासंदर्भात सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत महापौर सौ. भारती सोनवणे व आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी बैठक घेतली. एआयबीसीसी कंपनी संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर मनपाकडे सादर करणार असल्याची माहिती त्यांनी महापौर व आयुक्तांना दिली.
मनपाच्या तेराव्या मजल्यावर शनिवारी घेण्यात आलेल्या बैठकीला महापौर सौ.भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन लढ्ढा, रियाज बागवान, सुनील महाजन, विशाल त्रिपाठी, मनपा अधिकारी आणि एआयबीसीसी, झायलेम, सेनसिस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एआयबीसीसी कंपनीने जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन सुसज्ज यंत्रणा बसवून देत मनपाला फायदा होईल असे काही प्रकल्प सुचविणारा प्रस्ताव मनपाला दिला होता. शुक्रवारी प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी पुन्हा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. महापौर, आयुक्त यांच्यासह सर्वांनी प्रस्तावातील तांत्रिक आणि इतर बाबी समजून घेतल्या. सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन केले. जळगाव शहराचा आणि आजवरच्या आकडेवारीचा तसेच भविष्यातील गुंतवणूक व वसुलीचा अभ्यास करून सविस्तर डीपीआर मनपाकडे लवकरात लवकर सादर करण्यात येईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बैठकीत एक अत्याधुनिक वॉटर मीटर दाखवून त्याची वैशिष्ट्ये देखील विशद करण्यात आली.