पुणे (वृत्तसंस्था) ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली आहे,’ असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) समाविष्ट असलेल्या जाती, बेकायदा असून त्यांना बाहेर काढून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी मराठा समाजातील काही नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ते सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची भाषा करीत आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांना भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची सकारात्मक भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्यात यावे, असेच सर्व जण म्हणत आहेत. आघाडी सरकार, भाजप सरकार आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी समता परिषदेने पाठिंबा दिला आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार नाही, याचीही खबरदारी घेतली गेली. मात्र, आता मराठा आरक्षणाचा विषय वेगळ्या मार्गावर जात आहे. ओबीसीतील काही जातींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीत आता ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम आम्हाला करावे लागेल,’ असे भुजबळ यांनी सांगितले.
‘महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न मिळावा, हे आम्हाला वाटते. मात्र, ते न मिळाल्याने त्यांचे कार्य, उंची कमी होत नाही. या देशात महात्मा तीनच होऊन गेले. आता दुर्दैवाने भारतरत्न कोणालाही वाटला जात आहे. त्यामुळे महात्मांना महात्माच राहू द्या,’ असे विधानही छगन भुजबळ यांनी कले.