वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) काल गुरुवारी काबूल विमानतळावर दोन आत्मघाती स्फोट झाले. या स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. तर मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. ‘हा हल्ला आम्ही विसरणार नाही, आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु, असे जो बायडेन म्हणाले.
व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिलाय. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि यासाठी हल्लेखोरांना माफीही मिळणार नाही असं बायडेन म्हणाले आहेत. “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असं बायडेन म्हणालेत. यासह बायडेन म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानातल्या अमेरिकन नागरिकांना वाचवू. कमीत कमी एक हजार अमेरिकन आणि इतर अन्य अफगाणी अजूनही काबूलमधून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहेत.
दरम्यान, ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर दोन स्फोटांनंतर काबूलमधील अमेरिकी दूतावासाने अमेरिकी नागरिकांना विमानाचा प्रवास टाळण्यासाठी आणि विमानतळावरील गेट टाळण्यासाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.
काबुल दोन बॉम्बस्फोटांनी हादरले
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.