मुंबई (वृत्तसंस्था) सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज निधन झाले आहे. आपल्या भारदस्त आवाजने त्यांनी टिव्हीवर एक काळ गाजवला होता. दुरदर्शनपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. त्यांच्या निधनावर माध्यम क्षेत्र आणि इतर क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रदिप भिडेंच्या निधनाने ‘आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज बंद झाला आहे. विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले. प्रदीप भिडे यांनी ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरु केली. त्या माध्यमातून त्यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट यावर काम करत आपला ठसा उमटवला. प्रदिप भिडे यांनी आतापर्यंत सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन केले आहे.
राज्यात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळ्याचे त्यांनी सूत्रसंचालन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे.