जळगाव (प्रतिनिधी) कार लोन घेण्याची चौकशी करणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाला चौघांनी बिझनेस लोनची ऑफर देत तब्बल २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साहील वसंतराव गाढे (रा. पवार पार्क, आव्हाणे शिवार) या तरुणाची चौघांनी फसवणूक केली आहे. पुजा सुनिल चौहान (रा. मुंबई), सुनिल चौहान (रा. नाशिक), राज व पुजाची आई (पुर्ण नाव माहित नाही) असे चौघां संशयित आरोपींचे नाव आहे. या चौघांच्या विरुद्ध बुधवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Online Fraud In Jalgaon)
साहील गाढे हे एका खासगी कंपनीला वाहने पुरवण्याचा व्यवसाय करतात. व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना १४ लाख रुपयांचे कार लोन हवे होते. यासाठी त्यांनी त्यांच्याकडे मॅनेजर असलेल्या महेश चव्हाण याला सांगीतले. यानंतर महेशने डीएसए नावाच्या ऑनलाईन लोन देणाऱ्या कंपनीबाबत सुचवले. त्यानुसार, साहील यांनी कागदपत्र दिले. तेथुन मुंबईच्या कार्यालयातील पुजा चौहान हिच्याकडे फाईल पाठवल्याचे सांगीतले. पुजाने सीव्हील खराब आहे वाढवून देण्यासाठी साहीलकडून २० हजार मागीतले. पैसे मिळाल्यानंतर कार लोन सोडून कमी व्याजदरात बिजनेस लोन मंजूर करुन देते. बीझनेसचा सेटअप देखील करुन देऊ असे आमीष पुजाने दिले. या आमीषांना बळी पडलेल्या साहिलकडून पुजासह चौघांनी वेळोवेळी काहीही कारणे सांगत ऑनलाईन पैसे उकळायला सुरुवात केली.
जीएसटी, डॉक्युमेंट, प्रोसेसिंगच्या फीच्या नावाखाली २३ लाख २४ हजार ६९२ रुपये उकळल्यानंतरही त्यांनी साहिलला कर्ज देण्यास टाळण्यास करण्यास सुरूवात केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर साहिलने पैसे परत मागण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. अगदी साहिलने नातेवाईक, मित्रांकडून उसनवार, चारचाकी व दुचाकी विकुन पैसे दिल्यामुळे परत मिळवण्यासाठी विनवण्या देखील केल्या. तरी देखील त्यांचे पैसे परत न मिळाल्यामळे अखेर साहिल यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पुजासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.