नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळ ग्रहावरील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी मंगळावर परग्रहवासीयाच्या अर्थात एलियनच्या पावलाचा ठसा असल्याचे मत व्यक्त केले आणि चर्चेला उधाण आले. दरम्यान, नैसर्गिक रचनेचा लांबून वेगाने काढलेला फोटो बघताना एलियनच्या पावलाचा ठसा बघत असल्याचा भास होतो.
मार्स ऑर्बिटरच्या मदतीने मंगळ ग्रहाचा नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्याने मंगळ ग्रहाचे फोटो काढले जात आहेत. ही प्रक्रिया सुरू असताना काढलेला एक फोटो ‘नासा’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक पिक्सल म्हणजे ५० सेमी या मापाच्या आधारे फोटो बघण्याची सूचना ‘नासा’ने केली आहे.
हा निव्वळ भास
फोटोत मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग दिसत आहे. ज्या ठिकाणाचा फोटो आहे तिथे नैसर्गिक कारणांमुळे काही चढउतार, खड्डे निर्माण झाले आहेत. या नैसर्गिक रचनेचा लांबून वेगाने काढलेला फोटो बघताना एलियनच्या पावलाचा ठसा बघत असल्याचा भास होतो. भौगोलिकदृष्ट्या मंगळ ग्रहाच्या मध्यभागाचा नकाशा तयार करत असताना काढण्यात आलेल्या फोटोंपैकी एक फोटो ‘नासा’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो एलियनच्या पावलाच्या ठश्यासारखा भासत असला तरी तसे प्रत्यक्षात नाही. हा निव्वळ भास आहे.
मंगळ ग्रहावरील माती आणि दगडांची तपासणी सुरू
‘नासा’ने परसेवरेंस रोव्हर मंगळ ग्रहावर पाठवले आहे. यात अनेक आधुनिक उपकरणे आहे. या उपकरणांच्या मदतीने मंगळ ग्रहावरील माती आणि दगडांची तपासणी सुरू आहे. ग्रहावरील वेगवेगळ्या भागांचे उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांनी अनेक फोटो काढण्यात आले आहेत. मंगळावरील खडकांची रचना, ग्रहावरील खनिज संपत्ती याबाबतची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जमिनीत खोलवर एक उपकरण पाठवून भूपृष्ठाखालील रचनेचे फोटो काढण्याचेही काम सुरू आहे.