बीड (वृत्तसंस्था) शहरात राहणाऱ्या चार मुलांची आई आणि एका विवाहित व्यक्तीने आपल्या जोडीदारांसह पोटच्या लेकरांना सोडून देत घरातून पळ काढला आहे. शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे परिसरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका महिलेचा पती तिच्या सोबत तक्रार देण्यासाठी आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत पळून गेल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. आपला जोडीदार आपल्याला सोडून दुसऱ्यासोबत गेल्याची कुणकुण लागताच इतर दोन्ही जोडीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेत ‘साहेब, आमचा जोडीदार शोधून आणा’ अशी विनवणी केली. बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात एक विवाहित महिला आपल्या चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन आली. तिच्या पाठोपाठ एक तरुण आला. पोलीस ठाण्यात असणाऱ्या महिला हवालदार मीरा रेडेकर यांनी, महिलेची चौकशी केली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने आपली कैफियत सांगायला सुरुवात केली. तिच्या पतीचे सोबत आलेल्या तरुणाच्या पत्नीशी प्रेमप्रकरण सुरू असून, ते दोघे घरात न सांगता पळून गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर महिलेच्या सोबत आलेल्या तरुणाने आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. तक्रारदार तरुण म्हणाला की, “साहेब मी हॉटेलात काम करतो, मला 4 अपत्ये आहेत, मी दिवसभर बाहेरच असतो, यांच्या पतीचे माझ्या पत्नीसोबत कधी कनेक्शन जुळले हे माहितच नाही, साहेब… दया करा आणि मला माझी बायको शोधून द्या” असं म्हणत त्याने पोलिसांना विनंती केली.