नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत चर्चेदरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड मत मांडलं. तसेच केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. केंद्र सरकारने सादर केलेलं १०२वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं आहे. हे विधेयक म्हणजे सोन्याचं ताट आहे. चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट दिलं. पण ताटात काहीच नाहीये. मग खायचं काय?, असा सवाल राऊत यांनी केला.
“देशातील सर्व राज्यांना विकलांग करायचं आणि सत्ता केंद्रीभूत करायची. यासाठी १०२ वी घटनादुरुस्ती केली, हे मंत्री महोदयांनी मान्य केलं आहे. त्यानंतर जे काही घडलं रामायण महाभारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले केंद्र सरकारला दाखवून दिले आहे की, १०२ वी घटना दुरुस्ती करून तुम्ही संपूर्ण देशातल्या आरक्षित समाजात समाजावर अन्याय केलेला आहे. आता १०५ वी घटना दुरुस्ती आणण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केलेला आहे. आगीतून फोफाट्यात टाकायचं अशी आमच्या मराठीत म्हण आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीने उद्ध्वस्त केलं. मात्र १०५ व्या घटना दुरुस्तीने नेमकं काय दिलं?”, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. “विधेयक ज्या वेळेला आलं. महाराष्ट्रातील सर्व समाजाला वाटलं की, केंद्र सरकारने विश्वासघात केला. हे माझं मत नाही. मी म्हणतो बरं झालं हे विधेयक आणलं. पण अपुरं आणलेलं आहे. जेवायला वाढताना केवळ चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट ठेवलं, पण त्या ताटात काहीच नाही. मीठ नाही, लोणचं नाही, पंचपक्वान्न सोडा. खायचं काय त्या ताटातून? १०५ वी घटना दुरुस्ती करत असताना तीन वेगवेगळे बदल केले. या घटना दुरुस्तीनुसार तुम्ही राज्य सरकारना कोणता अधिकार दिला?” असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.
अतिरिक्त आरक्षणाची तरतूद कुठेय?
मराठा समाजापासून गुर्जरपर्यंत आरक्षण देण्यासाठी या विधेयकात काय तरतूद केली हे सांगा आम्हाला? १०३व्या घटना दुरुस्तीने २७ टक्के आरक्षण दिलं. कोणत्याही जातीतून आरक्षण द्या असं कोणतीही जात म्हणत नाही. आम्हाला अतिरिक्त आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. त्याची तरतूद या विधेयकात कुठे आहे? कोल्ह्याला द्राक्षे आंबट त्याप्रमाणे विधेयक आम्ही पास केलं. पण हातात काहीच दिलं नाही. केंद्राने का आमच्या तोंडाला पानं पुसली असं मराठा समाजाला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.