नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. यावेळी पीएम मोदींनी कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात कसे काम झाले ते सांगितले. तसेच आज काँग्रेस नसती तर स्थिती काय असती हे देखील खोचक शब्दात मोदींनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिख लोकांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मिर सोडावं लागलं नसतं. काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती”, अशी टीका मोदी यांनी केली.
काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधी विचार केला नाही. देशाला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते तेव्हा सर्वात पहिलं गुणवत्तेला लक्ष्य केलं जातं. सर्व पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षात लोकशाही अंमलात आणली पाहिजे, काँग्रेसने याचा सर्वात आधी याचा विचार केला पाहिजे अशी घणाघाती टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली