मुंबई (वृत्तसंस्था) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक CET घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासननिर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी २४ बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना ९ वी व १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष २०२०-२१ साठी इ. १० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ १० वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. ९ वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीचे निकष जाहीर करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. ती म्हणजे गतवर्षी नववीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ही माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे. २०२०-२१ चा दहावीचा निकाल कोरोना संसर्गामुळे नव्या निकषांच्या आधारे लावण्यात येणार आहे. निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या निकषानुसार मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शालेय स्तरावर सात सदस्यांची समिती असेल. त्यानंतर विभागीय स्तरावरील अधिकारी निकालाची पडताळणी केली जाईल. एखाद्या ठिकाणी गैर प्रकार झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जून २०२१ अखेर निकाल जाहीर करण्यात येईल. खासगी विद्यार्थी, तुरळक विद्यार्थी यांच्यासाठी देखील हे निकष लागू असतील.
अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा
अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कनिष्ट महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावंर जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्यातील विविध बोर्डांंच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धती वेगळ्या असल्यानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.