मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील पालिका निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात, असे मोठे वक्तव्य भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते बुधवारी प्रसारमाध्यांशी बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाही. न्यायालयाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याबाबत मे महिन्यापर्यंत निकाल लागू शकतो. रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात पाटील म्हणाले “सुप्रीम कोर्ट ‘मे’ महिन्याच्या सुट्टी आधी निर्णय घेईल. त्यानंतर पावसाळ्यानंतर प्रभाग रचना आणि त्यानंतर साधरण ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणूक होईल. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी आग्रही आहे. तर महाविकास आघाडीचा या प्रभाग रचनेला विरोध आहे.
92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, बदललेल्या वॉर्ड रचनेला दिलेलं आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्यानं निवडणुका खोळंबल्या आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पालिका निवडणुका होऊ शकतात. तर शिंदे-फडणवीस सरकारकडून पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचे आदेश दिले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी शिफारसी, हरकती आणि प्रभाग निश्चिती अशी सगळी प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवली जाईल. ही सगळी प्रक्रिया पावसाळ्याच्या काळात पार पडून ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता आधी पासूनच वर्तवली जात आहे.