पुणे (वृत्तसंस्था) प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराज महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा तू कुठे होतीस? आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवलं तेव्हा तू कुठे होतीस ? असा सवाल देसाईंनी उपस्थित केला आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात, “सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही. त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी.”
हेमांगी कवी काय म्हणाली?
आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं. मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे. पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं.
मी एक पोळी लाटतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मला खूप मेसेज आले. त्या व्हिडीओत माझे बूब्ज हलताना दिसतायेत वगैरे असं म्हटलं गेलं. त्याच्यावर अनेकांनी भाष्य केलं. तू मूर्ख आहेस, कामं मिळवण्यासाठी काहीही करतेस का? माझ्या घरी मुलगी असती तर, कानफडवलं असतं वगैरे असं म्हटलं. ७-८ बायकांनी तर मला सांगितलं डिसेंट वाग, डिसेंट कपडे घाल. एक स्त्री असं म्हणते, मला संताप आणि दु:ख वाटलं. बाईच बाईला हे सांगते.
पण कशासाठी? ती स्वत:च यातून जात असते. आपण बायकांना विचारलं, तुम्हाला ब्रा घालायला आवडतं का, तर ९९ म्हणतील नाही, नकोसं वाटतं. मग अभिनेत्री किंवा कोणत्याही मुलीवर हे का लादलं जातं? तुमचं मत असेल, तर तुमच्याजवळ ठेवा. मी का करते, कशासाठी करते, पैसे मिळवायचे आहे का, याबाबत लोक जजमेंटल होतात, त्यावरुन मी व्यक्त झाले.
महिलांनी देखील यावर व्यक्त व्हावं हे सांगताना हेमांगी म्हणाली की, कालच्या पोस्टनंतर अनेकांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. मला आवडलं. पण इतकीशी गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागत, हेच मुळात वेगळं होतं. ब्रा म्हणजे एक साधा कपड्याचा भाग आहे, त्यात धाडसाचं काय? पण इथूनच खरी सुरुवात आहे. मला वाटलं की काही बायका तरी असं म्हणतील की, तुझी ही पोस्ट वाचून मीही ब्रा घालणार नाही. पण असं धाडस अजूनही कोणी केलेलं नाही. खूप स्ट्रगल बाकी आहे आपला. मुलींनी स्वतःहून पुढे येऊन याबद्दल बोललं पाहिजे, की हो मी ब्रा वापरणार नाही. आणि कोणी बोललंच तर, ती बेधडकपणे उत्तर देईल. लाजणार नही आणि ओढणी वैगरे घेऊन गप्प बसणार नाही!