छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) प्लॉटची मोजणी केल्यानंतर नकाशा देण्याच्या बदल्यात साठ हजारांची लाच घेताना भूमिअभिलेख कार्यालयातील दोन भूमापकांना एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री टीव्ही सेंटर भागात करण्यात आली. सचिन बाबुराव विठोरे (३५) आणि किरण काळुबा नागरे (४३) अशी लाचखोरांची नावे आहेत.
३४ वर्षीय तक्रारदार यांचे पिसादेवी रोड येथील प्लॉटचे सरकारी मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दिला होता. भूमापन विठोरे आणि नागरे यांनी याची मोजणी केली. यानंतर नकाशा तक्रारदार यांना देण्यासाठी दोघांनी पंचासमक्ष मंगळवारी रात्री १ लाख १० हजारांची मागणी केली. पडताळणी होण्यापूर्वी तक्रारदाराकडून दोघांनी ५० हजारांचा हप्ता यापूर्वीच स्वीकारलेला होता. उर्वरित रक्कम रुपये ६० हजार टीव्ही सेंटर भागात दोघांनी स्वीकारले. एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, नंदकिशोर क्षीरसागर, अंमलदार तोडकर, नागरगोजे, पाठक, आघाव यांनी केली.