जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी भुसावळमधील ड्रग्स आणि कथित लैंगिक शोषणाची संपूर्ण भयावह कहाणी डीपीडीसीच्या बैठकीत सांगितली. यावेळी सभागृहातील वातावरण गंभीर झाले होते.
भुसावळमधील एका तरुणीने लैंगिक शोषणाची चर्चा मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा केली होती. आज डीपीडीसीच्या बैठकीत आमदार संजय सावकारे यांनी ड्रग्सचा विषय काढला. यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी तर संपूर्ण कहाणीच सांगून टाकली. भुसावळ येथे घडलेल्या एका तरुणीच्या लैंगिक छळाची गंभीर घटना जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी तोडीपानी करून दडपून टाकण्यात आल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. पिडीत मुलगी पोलिसांकडे गेली होती. त्यानंतर संबंधित मुलांना बोलवण्यात आले. मुलीच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडण्यात आले असल्यामुळे नशेतच हा प्रकार झाल्याचे पोलिसांना कळून चुकले होते.
चौकशी केली असता या घटनेतील युवकाने एमडी ड्रग्जच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या जवळ खाजगीत मान्य केले होते. परंतू संबंधित तरुण एका राजकीय नेत्याशी संबंधित होते. त्यानंतर व्हाटसअप फोनवरून त्या नेत्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्याला फोन करून मदत करायला सांगितली. त्यानंतर प्रकरण दाबले गेले. या घटनेची माहिती अनेकांना कळल्यामुळे ड्रग्सची केस न करता गावठी कट्ट्याची केस दाखवण्यात आली. या घटनेत पोलिसांनी अप्रत्यक्षरित्या पैसे घेतले आहेत, हे माझ्याकडे रेकॉर्डवर आहे. एखादं दिवशी सगळं एक्सपोज करेल, अशा शब्दात आ. मंगेश चव्हाण यांनी आपला संताप व्यक्त केला. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिलेत.