मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असून सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे प्रवीण चव्हाण हे नेमके कोण आहेत आणि त्यांची नेमकी कारकीर्द काय राहिलीय?, याचा थोडक्यात घेतलेला आढावा जाणून घेऊ या !
प्रवीण चव्हाण कोण आहेत?
महाराष्ट्रातील अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलंय. जळगावमधील घरकुल घोटाळा ज्यामध्ये सुरेशदादा जैन आणि गुलाबराव देवकर यासारख्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं, त्या प्रकरणात प्रवीण चव्हाण विशेष सरकारी वकील होते. हजारो कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या प्रकरणात प्रवीण चव्हाण हेच सरकारी वकील आहेत. पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यावर हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा जो गुन्हा दाखल आहे, त्या प्रकरणातही प्रवीण चव्हाण सरकारी वकील म्हणून काम पाहतात. खंडणीच्या ज्या प्रकरणात आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला अटक करण्यात आली होती, त्या प्रकरणात देखील प्रवीण चव्हाणच सरकारी वकील म्हणून काम पाहताय. ज्या प्रकरणात गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्या प्रकरणातही प्रवीण चव्हाण हेच विशेष सरकारी वकील आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केल्यानंतर प्रवीण चव्हाण हे त्यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनीतील कार्यालयाला कुलूप लावून निघून गेल्याचे कळतेय.
प्रवीण चव्हाण मूळचे जळगाव जिल्ह्यातील !
प्रवीण चव्हाण हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील आहेत. आता याला योगायोग म्हणा किंवा आणखी काही.. घरकुल घोटाळा, बीएचआर घोटाळा आणि आताचे गिरीश महाजनांचे प्रकरण या जळगाव जिल्ह्यातील तिन्ही महत्वाच्या प्रकरणांमध्ये प्रवीण चव्हाण हेच सरकारी वकिल आहेत. खटल्यातील आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचवण्याची प्रवीण चव्हाण यांची ख्याती राहिली आहे. भले ते आरोपी कितीही मोठे असो पण आता प्रवीण चव्हाण यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आल्यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. दरम्यान, न्यायालयात जबरदस्त युक्तिवाद आणि भक्कम बाजू मांडण्यासाठी प्रवीण चव्हाण ओळखले जातात, हे विशेष !
घरकुल प्रकरणात चव्हाण यांना हटविण्यास अण्णा हजारे यांनी केला होता विरोध
घरकुल गैरव्यवहार प्रकरणात ४८ आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने शिक्षा दिली होती. यामध्ये माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचाही समावेश होता. खटल्यात सुरुवातीपासून चव्हाण यांनी अभ्यासपूर्वक काम पाहत आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले होते. असे असताना चव्हाण यांना पुढील कामकाजात ठेवण्याऐवजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. चव्हाण यांना सावंत यांचे सहायक म्हणून नियुक्त करण्यात होते. हा निर्णय अयोग्य व संशयास्पद असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले होते. हजारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यात म्हटले होते की, ‘सरकारने केलेला हा बदल योग्य वाटत नाही. शिवाय तांत्रिकदृष्ट्या व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाहता या प्रकरणी दुसऱ्या वकिलांची नियुक्ती योग्य ठरणार नाही. दरम्यान, ऍड. चव्हाण यांना उच्च न्यायालयातील कामकाजाचा सुमारे अठरा ते वीस वर्षांचा अनुभव असल्याचे दिसून येते. म्हणून या खटल्यात वरिष्ठ न्यायालयातही चव्हाण यांनाच मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करणे योग्य ठरेल,असेही अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले होते.
खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले होते पत्र !
जळगाव घरकुल घोटाळ्यात शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन आरोपी होते. तसेच ते त्यावेळी कारागृहात होते. आरोपींना तीन वर्षे जळगाव सेशन्स कोर्ट व हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच सुप्रीम कोर्टात विशेष सरकारी वकील अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी व अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपींना जामीन मिळू दिला नव्हता. तर दुसरीकडे धुळे सेशन्स कोर्टात आरोपींविरोधात खटला सुरू होता. यासंबंधी मोठ्या प्रमाणावर पुरावे सादर करण्यात आले होते. अॅड. सूर्यवंशी आणि अॅड. चव्हाण या दोघांनी कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडली होती. पण काही मंडळी आरोपींना जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न करीत होते. तसेच गृह खात्यात अॅड. सूर्यवंशी आणि अॅड. चव्हाण यांना या खटल्यातून हटविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, असेही तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.