हैदराबाद (वृत्तसंस्था) 100 या नंबरवर कॉल करतात पोलीस तात्काळ सेवेत हजर होतात. पण एका व्यक्तीने या नंबरवर चक्क आपल्या बायकोने मटण न बनवल्याची तक्रार दिली आहे. एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा त्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर अशी विचित्र तक्रार येताच पोलिसांनी यावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले (Husband police complaint against wife). तेलंगणामधील ही घटना आहे.
होळीदिवशी नवीन हा पत्नीला मटण बनवायला सांगत होता. मात्र पत्नीने त्यास नकार दिला. पत्नीने मटण न बनावल्याने नवीनचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भारात १०० नंबवरवर वारंवार फोन केले आणि पत्नीची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांना कुणीतरी खोडसाळपणा करतोय, असे वाटले म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र वारंवार कॉल येऊ लागल्याने अखेर नवीनवर पोलिसांनी कारवाई केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला घरी जात ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीनवर भादंवि कलम २९० आणि ५१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पती मद्यपान करून आल्याने नाराज झालेल्या पत्नीने मटण बनवण्यास नकार दिला होता. आता पोलिसांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की, अशा प्रकारे फोन केल्याने पोलिसांच्या कामात अडथळे निर्माण होतात. ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना मदत मिळत नाही. त्यामुळे १०० नंबर हा गरजेच्या वेळीच वापरावा.