मेरठ (वृत्तसंस्था) चविष्ट स्वयंपाक न केल्यानं पत्नी-सासूने घरजावयावर अत्याचार केल्याची घटना मेरठमध्ये मोदीपुरममधून समोर आली आहे. तरुणाला त्याची पत्नी आणि सासूने काठीने मारहाण केली. याप्रकरणी पीडित तरुणाने तक्रार दाखल केली असून दोघांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
गाजियाबादमधील साहिबाबाद निवासी तरुणाचं लग्न कंकरखेडामधील एका कॉलनीतील तरुणीसोबत झालं होतं. तरुणीच्या माहेरी तिच्या आई-वडिलांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर मुलगा मुलीच्या माहेरी राहणार असल्याची अट ठेवण्यात आली. अटीनुसार, तरुण लग्नाच्या चार महिन्यानंतर आपल्या सासरी राहू लागला. तो गाजियाबादमधील कंपनीत नोकरी करतो आणि दररोज कंकरखेडाहून येत-जात असतो. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाकडून त्याची पत्नी घरातील काम देखील करवत होती. मात्र तरुण याचा विरोध करीत असे. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला होता.
शनिवारी पत्नीच्या ऑर्डरनंतर घरजावयाने भाजी-पोळी आणि वरण-भात केला. कोशिंबीरही केली आणि पत्नी, सासूचं ताट सजवून त्यांना जेवायला दिलं. स्वयंपाक चविष्ठ झाला नसल्याचं सांगून दोघेही त्याला बडबड करू लागले. घरजावयानं विरोध केला तर त्याला मारहाण करण्यात आली. शेजारच्यांनी कसंबसं करून घरजावयाला सासू आणि पत्नीच्या तावडीतून सोडवलं. यानंतर तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याने पत्नी आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावर पोलिसांनी सांगितलं की, तरुणाकडून तक्रार करण्यात आली आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे.