नूंह (वृत्तसंस्था) काँग्रेस धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांनी गुरुवारी भाजपवर सडकून टीका करत या पक्षाला सत्तेतून हुसकावून लावण्याचे आवाहन हरयाणाच्या जनतेला केले.
हरयाणातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नूंहमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. देशात आजघडीला प्रेम आणि द्वेष यादरम्यान लढाई सुरू आहे. काँग्रेस प्रेम पसरविण्याचे काम करते तर भाजप द्वेष पसरवत आहे, असे राहुल म्हणाले. देशात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बंधुभाव आहे. भाजप व आरएसएसचे लोक ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी द्वेष पसरविण्याचे काम करतात. कोणत्याही राज्यात गेल्यानंतर ते भाषा, धर्म आणि जातीबाबत बोलून देशात तोडण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. गांधीजी म्हणत होते की, द्वेषाला संपुष्टात आणावे लागेल. भारत द्वेष करणारा नाही तर प्रेम करणारा देश आहे. त्यामुळे देशात द्वेषाच्या राजकारणाचा आपण विजय होऊ देणार नाही. देशात फक्त प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा विजय होईल, असे राहुल गांधी म्हणाले. संपूर्ण सभेदरम्यान त्यांनी राज्यघटनेची प्रत आपल्या हातात ठेवली होती.
राज्यघटनेने गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या अधिकाराचे संरक्षण केले आहे. परंतु भाजप व आरएसएस राज्यघटनेवर हल्ला करत आहे. देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. एकीकडे देश राज्यघटनेवर चालावा यासाठी काँग्रेस झटत आहे. तर दुसरीकडे भाजप व आरएसएसला राज्यघटना संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महिला कुस्तीपटूच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले. आपण सगळ्यांनी पाहिले की, भाजपने देशाच्या कुस्तीपटूंसोबत काय केले. भाजपचे नेते न घाबरता महिलांवर अत्याचार करत आहेत. पण भाजपला याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याची टीका त्यांनी केली. हरयाणा विधानसभेच्या सर्व ९० जागांवर ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.