मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. पण वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिमच महावितरणने सुरू केली आहे. अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसने वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी एकच भूमिका मांडल्यामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आहे. वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा वादळी झाली. आज प्रश्न उत्तराच्या तासात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीच्या मुद्दा उपस्थितीत केला. ५७ खाली नोटीस देऊन फडणवीस यांनी घरगुती, शेतकरी वीज पंप कनेक्शन तोडल्या प्रकरणी प्रश्नं उपस्थित केला. ‘लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्दावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडकाम थांबवले पाहिजे’, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
नाना पटोले यावर बोलताना म्हणाले की, वीज बिलावरून कनेक्शन तोडणं सुरू आहे. त्याबाबत आमची भूमिकाही तशीच आहे. भाजप आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान झाल्यावर वीजेबाबत निर्णय होईल. वीज तोडण्यात येणार नाही. वीज कनेक्शन बाबत चर्चा करण्याची तयारी आहे, असं ते म्हणाले.
यावर फडणवीस म्हणाले की, या निर्णयाबद्दल दादांचे आभार त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ज्यांचे तोडले त्यांना वीज कनेक्शन लावून द्या. ते पुन्हा जोडण्यात यावे, सर्वांना सामान्य न्याय द्यावा अशी देखील मागणी केली.
















