मुंबई (वृत्तसंस्था) ‘मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर ‘हे उघडा ते उघडावाले’ या परिस्थितीची जबाबदारी घेणार का?’, असा खरमरीत सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व अन्य विरोधकांना फैलावर घेतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. कोरोनाच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे संबोधन होते. यावेळी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेने या संकटात जी साथ दिली आणि सहकार्य केले आहे, त्याला सलाम केला. कोरोना काळात सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद, दिवाळी या सणांमध्ये सरकारने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. नुकतेच छठपूजा पर्व पार पडले. यावेळीही उत्तर भारतीयांनी गर्दी टाळून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्या सर्वांचेच कौतुक करताना तुम्ही दाखवलेल्या सहकार्याला तोड नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी त्या युद्धात प्राणपणाने दहशतवाद्यांशी सामना केला होता. आताही आपण कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी वारकऱ्यांनाही हात जोडून विनंती केली. आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकी एकादशी बाबतही करावे, असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू-भगिनींना करतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा हा माझा सवाल आहे. पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत. कोणती गोष्ट कधी सुरू करायची याचे भान आम्हाला आहे. शाळांबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनाची भीती असल्याने अजून शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. आम्ही अत्यंत सावधपणे पुढे जात आहोत. त्यामुळे उगाच गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
















