पुणे (वृत्तसंस्था) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे लिगल सेलकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन राज्यातील भाजपनेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, भाजपने काल भाजप मुंबई कार्यालय ते मंत्रालयावर मविआ सरकारविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी ओबीसी आरक्षणासाठी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितले नाही’,अशी प्रतिक्रिया दिली होती.
सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, ‘तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा,अन्यथा मसणात जा पण आरक्षण द्या; तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?’ अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे पाटील य़ांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येत आहे. अशातच आता पाटील यांच्या विरोधात वकील असिम सरोदे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
















