मुंबई (वृत्तसंस्था) दिवाळी अवघ्या १० दिवसांवर आलेली असताना सर्वसामान्यांसाठी लोकलफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. याचे गंभीर परिणाम मुंबईतील डब्बेवाल्यांच्या व्यवसायावर झालेला आहे. कर्मचारीच नसल्याने डबे पोहचवणार कोणाला? असा प्रश्न आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास आर्थिक कोंडीमुळे यंदाची दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे.
या स्थितीत जेवणाची चिंता भेडसावत असताना तोंडावर आलेली दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून असंघटित कामगारांना ज्या पद्धतीने ५ हजार रुपये अनुदान जाहीर केला ते अनुदान त्वरित डबेवाल्यांना द्यावं आणि त्यांचा हा दिवाळी सण गोड करावा अशी मागणी डबेवाल्यांकडून होताना दिसत आहे. मुंबईतील डबेवाल्यांच संपूर्ण जगभर नाव आहे. मात्र हेच डबेवाले सध्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून घरीच बसून असलेल्या डबेवाल्यांना काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी आपल्या घरात कशी साजरी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. डबेवाल्यांचा व्यवसाय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. ग्राहकच घरी असल्याने लोकल असून नसल्यासारखी असल्याचे डबेवाले सांगतात. लोकलमधील गर्दी नियोजनाची बैठकच रखडल्याने सुमारे ६५-७० लाख प्रवाशांचा लोकलप्रवासाला बसलेली खीळ कायम आहे. राज्य सरकारकडून बैठक आयोजित करण्यात येणार आहे. गर्दी विभागण्यासाठी कार्यालयीन वेळ बदलाबाबत सरकारकडून काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सद्यस्थितीत जवळपास १०-१५ लाख अत्यावश्यक प्रवासी लोकल फेऱ्यांमधून प्रवास करत आहे. एकीकडे भूमिपूत्र असलेला डबेवाला आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे बहुतांश परप्रांतीय असलेल्या असंघटित कामगारांना पाच हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारने केली. डबेवाल्यांची यात नोंद असूनही त्यांना मदत मिळाली नाही.
















