जळगाव (सुरेश उज्जैनवाल) “जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि मंगल आहे, त्या सर्वांचा एकत्रित सहवास कुठे पाहायचा असेल तर फारच थोडी व्यक्तिमत्त्व अशी असतात जिथे या सर्व उदात्त मानवी गुणांचा सहवास असतोच. अशा थोड्या व्यक्तिमत्त्वामध्ये जळगावच्या ‘के.सी.ई. आणि लेवा एज्युकेशनल युनियनचे प्रथितयश अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे (नंदूदादा बेंडाळे) यांचा उल्लेख आवर्जून करावं लागेल. निमित्त आहे, त्यांच्या वाढदिवसाचं.
श्री.बेंडाळे गुरुवारी (7 एप्रिल) आपल्या वयाची 68 वर्षे पूर्ण करून 69 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसानिमित्त त्याचं अभिष्टचिंतन आणि पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा…!
जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात आपलं नावलौकिक प्राप्त केलेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आणि लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष श्री.बेंडाळे गेल्या दीर्घकाळापासून या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधित्व करीत आहे. या दोन नावलौकिक प्राप्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील दुरदर्शीता, कल्पकता आणि सतत नाविन्याचा ध्यास अनुभवास येतो. पत्रकार म्हणून मी गेली 35 वर्षे या व्यक्तिमत्वास बघत आहे. अलीकडे बहुतेक शैक्षणीक संस्थाचें चालक व त्याची कार्यपद्धती बघितली तर ते शिक्षण संस्था चालक कमी आणि राजकारणी अधिक, असे सर्व सामान्यपणे अनुभवास येते, मात्र स्वतः श्री बेंडाळे हे कधीही त्या वाटेने गेल्याचे दिसून आलें नाही की, संस्था अंतर्गत राजकारणाचा शिरकाव होऊ दिला नाही. अतिशय सचोटीने एखाद्या विश्वस्तां प्रमाणे ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचे अवलोकन केल्यास जे जे नाविन्यपूर्ण आणि शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे, ते सर्व आपल्या शैक्षणिक संकुलात श्री.बेंडाळे यांनी उपलब्ध करून दिले. नवं नवे विना अनुदानित अभ्यासक्रम व विविध प्रकल्प स्वतः च्या हिमतीवर उभारले आणि कार्यन्वित ही केले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या उच्च शिक्षणासह बायो टेक्नॉलॉजी ते फाइन आर्ट्स एवढंच नव्हे तर कला, क्रीडा, संगीत, नाट्य कला आदी नवं नविन प्रयोग सुरू केले.
तात्पर्य केम्ब्रिज-ऑक्सफोर्डच्या कम्प्लिट मॅन ऑफ ग्लोबलायझेशनच्या दिशेने सर्व विद्या शाखांचा विस्तार केल्याचे दिसून येत आहे. सामाजिक दृष्ट्या या व्यक्तीमध्ये अठरापगड जातींना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती त्यांच्या बोलण्यासह आचरणातून ही दिसून येते, म्हणून ते कुठल्याही धार्मिक अथवा राजकीय विचारसरणीच्या प्रेमात नाहीत. एक प्रयोगशील शेतकरी, आध्यत्मिक विचाराचं सखोल ज्ञानी, स्पष्टवक्तेपणा, परखड विचार, तेवढीच संवेदनशीलता अन नम्र स्वभाव ही सर्व गुण वैशिष्ठे, हीच त्यांच्या वेगळेपणाची पावती आहे. आणि म्हणूनच श्री.बेंडाळे “दिग्गज पूर्वसुरींच्या विचाराचं, कार्याचं आणि तत्वचिंतानाचं परिशीलन करीत त्याला आधुनिकतेची जोड कशी देता येईल, याचा विचार करणारं व्यक्तिमत्व आहे. जागतिक पातळीवर आकार घेत जाणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक प्रवाहांची सातत्याने चिकित्सा करीत आहेत. त्यातील श्रेयसाशी सकारात्मक दृष्टिकोनातून कसं जोडून घेता येईल, यावर ते निश्चितपणे चिंतन करीत असतात.
आपल्या समाजाच्या दीर्घकालीन गंभीर समस्येवर मात करू शकेल, असं शिक्षण आणि स्वतः च्या सर्जनशीलतेची पराकाष्ठा करून विकसित करण्याचा त्यांचा ध्यास अखंड सुरू राहो, हीच यानिमित्ताने शुभेच्छा….!
सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव