धरणगाव (प्रतिनिधी) रासायनिक खतांच्या किमतीत करण्यात आलेली वाढ तात्काळ रद्द करावी, अन्यथा लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा धरणगाव तालुका काँग्रेसचे युवानेते चंदन दिलीपराव पाटील यांनी दिला आहे.
देशभरात युरियानंतर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या डाय अमोनियम फॉस्फेटच्या (DAP) 50 किलो खताच्या गोणीची किंमत 1200 वरुन थेट 1900 रुपये झाली आहे. ही वाढ तब्बल 58 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आधीच शेतात उत्पादित मालाला हमी भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्यात आता खतांच्याही किमती वाढणार असल्याने शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे. या दरवाढीला कॉंग्रेसने जोरदार विरोध केलाय. तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. आता पर्यंत किरकोळ पन्नास ते शंभर रुपये भाव वाढवायची तरी त्यावर टीका व्हायची मात्र एक एप्रिलपासून होणाऱ्या उत्पादनाची भाववाढ होईल असे अॅग्रोवन पेपरला जाहीर झाल्यानंतर केंद्रीय खत व रासायनिक मंत्री जाहीर केले की, अशी कोणतीही भाव वाढ होणार नाही परंतु आता जे खत येत आहे, त्यांची भाववाढ झाली आहे. आधीच कोरोना च्या संकटामुळे देशातील नागरिक व शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यावर केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या खताच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना पूर्णपणे उध्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दरवाढीच्या व केंद्र शासनाच्या जाहीर निषेध लवकरच शेतकऱ्यांसोबत केंद्र शासनाच्या विरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी दिला आहे.